May 28, 2023

Rain :राज्यात पुन्हा एकदा अवकाळी!

Rain :राज्यात पुन्हा एकदा अवकाळी!

Rain नगर ः राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वातावरणात सातत्यानं बदल हाेत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवताे आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा दिला आहे. सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आज (4 एप्रिल) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. मात्र, हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आल्याने फळ आणि पिक उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. 

गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात  उद्या (5 एप्रिल) पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातही 6 एप्रिलला हवामान विभागानं पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात 7 एप्रिलला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळनाडूपर्यंत होत आहे. त्यामुळे द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यातून पाऊस पडू शकताे.