केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच देशातील जनतेसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशीच एक योजना म्हणजे देशातील गरीब व कमकुवत उत्पन्न गटाच्या मदतीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आहे. या योजनेमध्ये देशातील गरीब लोकांना तांदूळ, गहू, अशी अन्नधान्याची मोफत मदत दिली जाते. पण यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका म्हणजेच रेशनकार्ड असणे अनिवार्य आहे.
सरकारने गव्हाचे उत्पादन कमी झाल्यामुळे एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे सरकारच्या पुरवठा विभागाने रेशनवरील गहू कमी करुन त्याऐवजी तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानात प्रती कुटुंब 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जात होता. मात्र आता इथून पुढे 1 किलो गहू आणि चार किलो तांदूळ दिले जाणार आहे. परंतु याबाबत राज्याच्या पुरवठा विभागाकडून त्याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदूळ लोकांमध्ये जास्त वितरित केले जाणार असल्याचे नुकतेच मीडिया रिपोर्ट नुसार समोर आले आहे. आता सरकारच्या या निर्णयावर लोक नाराजी व्यक्त करू शकतात, अशी शक्यता तज्ञांनी सांगितली आहे.