January 27, 2023

राज ठाकरे यांचे पत्रक जाहीर.. पोलिस कारवाईनंतर कार्यकर्त्यांना केले ‘असे’ आवाहन..!

राज्यात भोंग्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. औरंगाबाद येथील सभेतील भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावून त्यांची धरपकड सुरु केली आहे..

मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 4 तारखेचा ‘अल्टीमेटम’ दिला होता. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ठाकरे सरकारही सतर्क झाले आहे. पोलिसांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या आहेत

राज्याचे राजकारण पेटलेलं असताना, आज (ता. 4 मे) काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मंगळवारी (ता. 3) रात्री एक पत्रक जाहीर केले.. त्यात त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं आहे..

पत्रकात काय म्हटलंय..?
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलिस यंत्रणा व राज्य सरकार कडक कारवाईच्या तयारीत असतानाही राज ठाकरे यांनी भोंग्याबाबतच्या भूमिकेवरुन माघार घेण्यास नकार दिला आहे.

पत्रकात ते म्हणतात, की ‘देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, की 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर ‘हनुमान चालीसा’ लावावी. भोंग्यांचा काय त्रास होतो, हे त्यांनाही समजू दे..”

आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत, परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही..”

“आमचं मुस्लिम धर्मियांना एवढंच सांगणं आहे, की हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल..”

तीन कलमी कार्यक्रम

दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रमच पत्रात जाहीर केला आहे. सगळ्या अटी हिंदूनाच, त्यांना कोणत्याही अटी नाहीत, त्यामुळे हिंदूनो,

  • त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.
  • सर्व स्थानिक मंडळे, सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी. स्वाक्षऱ्यांची निवेदने रोज पोलिस ठाण्यात नेऊन द्यावीत.
  • मशिदीत बांगेला सुरुवात झाल्या झाल्या 100 क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबद्दल पोलिसांकडे तक्रार करावी. रोज करावी.

आता नाही तर कधीच नाही…

“देशात इतकी कारागृहं नाहीत, की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबण सरकारला शक्य होईल. हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही तर कधीच नाही..” असं आवाहन पत्राच्या शेवटी राज ठाकरेेंनी केलं आहे