पुणे : पुण्यातील हडपसर भागातून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई समान असणाऱ्या काकीचे अश्लील फोटो काढून पुतण्याने तिला ब्लॅकमेल केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय काकीने तिच्या ३० वर्षीय पुतण्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे चार वर्षांपूर्वी फिर्यादी या आंघोळ करत असताना आरोपीने त्यांचे अश्लील फोटो काढले. हे फोटो पतीला आणि जावयाला दाखवायची धमकी देत त्यांना प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले. इतकंच नाही तर धमकी देत फिर्यादी यांना चार वेळा बाहेर भेटायला सुद्धा बोलावले.
पुतण्याकडून वारंवार होणारा हा त्रास असह्य झाल्याने फिर्यादी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतरच हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. तुम्ही जर बाहेर भेटायला आल्या नाहीत तर फोटो पती आणि जावयाला दाखवून तुमची समाजात अब्रु घालवेल अशी धमकी आरोपीकडून वारंवार येत होती. हा त्रास सहन न झाल्याने फिर्यादी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.दरम्यान, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.