December 5, 2022

पुण्याच्या नामांकित शाळेतील १० वीची विद्यार्थीनी ४ महिन्याची गर्भवती अन् तपासानंतर सगळ्यांनाच धक्का बसला

किरण शिंदे/ प्रतिनिधी पुणे : पुण्यातील खडकी परिसरातील एका नामांकित शाळेतील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी एक 16 वर्षीय तरुणी गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीच्या मैत्रिणीच्या भावाचा मित्र असलेल्या एका तरुणाने तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले आणि यातून ही तरुणी चार महिन्याची गर्भवती राहिली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 16 वर्षीय पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आणि आरोपी तरुणाची ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणाने तिला गप्पा मारण्यासाठी खडकी परिसरातीलच एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्ती करत शरीर संबंध ठेवले.

खडकी परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर चार ते पाच वेळा हा प्रकार घडला. याविषयी कुणाला काही सांगितल्यास तुझ्या आई व बहिणीला सोडणार नाही अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. दरम्यान या सर्व प्रकारातून पीडित तरुणी 4 महिन्याची गर्भवती राहिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहे.