January 26, 2023

पीएम किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा होणार पुन्हा फायदा..!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला.. देशातील तब्बल 10.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर मोदी सरकारने तब्बल 21 हजार कोटी रुपये वर्ग केले.  प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 11 व्या हप्त्यापोटी 2 हजार रुपये जमा झाले आहेत..

पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्यानंतर आणखी एक ‘गुड न्यूज’ समोर येत आहे.. ती म्हणजे, हे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकेत जाण्याची गरज नाही, तर पोस्टमनच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याच्या थेट दारात येणार आहेत.

पोस्टमन देणार घरपोच पैसे
मोदी सरकारने पीएम किसान निधीची रक्कम शेतकऱ्यांना घरपोच देण्याची जबाबदारी पोस्ट विभागावर सोपवली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय टपाल विभागाला विशेष अधिकार दिले आहेत. शेतकऱ्यांना घरपोच पैसे देण्यासाठी पोस्ट विभागाने (Post Office) नवी योजना तयार केली आहे. त्यानुसार, पोस्टमन (Postman) शेतकऱ्यांच्या घरोघर जाऊन त्यांना किसान सन्मान निधीचे पैसे देणार आहेत. टपाल विभागाने त्यासाठी 13 जूनपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे..

पोस्ट विभागाने आपल्या टपाल कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, येत्या 13 जूनपर्यंत सर्व टपाल कार्यालयातील ‘पोस्टमन’ना ही रक्कम दिली जाणार आहे.. ही रक्कम शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम पोस्टमन करणार आहेत. विशेष म्हणजे, या सुविधेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

वास्तविक, आतापर्यंत शेतकरी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही त्यांचे हे पैसे काढू शकत होते, परंतु शेतकऱ्यांना आता तेथेही जाण्याची गरज नाही. पोस्टमन घरोघरी जाऊन शेतकऱ्यांचे ‘थम्ब’ घेऊन पीएम किसान सन्मान निधीची रक्कम देणार आहेत.

अनेक शेतकरी वंचित
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे रोजी 10 कोटींहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यावर 21 हजार कोटींची रक्कम वर्ग केली. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. काही कारणांमुळे या शेतकऱ्यांचा हप्ता थांबला असून, लवकरच तो त्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.. तसेच, पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना 10 हप्त्यांचे पैसे परत करण्याबाबत नोटीसा आल्या आहेत. या शेतकऱ्यांना योजनेंतर्गत मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत सांगितले आहे.