January 27, 2023

गाईचं की म्हशीचं? शरीरासाठी कोणतं तूप चांगलं ते घ्या जाणून..

आपल्या देशात जवळजवळ प्रत्येक घरात तूप असतंच. अनेकांना जेवणात भात वरण, पुरणपोळी सोबत तर आजकाल मांसाहार करणारी लोक देखील तुपाचा वापर जेवणात करतात. तूप (Ghee) जेवणात असणं चांगलं समजलं जातं. कोणाला ते खूप आवडतं तर कोणी गावरान तूप (Desi Ghee) आवडत नाही म्हणून शरीरास फायदेशीर इतर पदार्थांसारखं हेही खाणं बंद करतात.

तुपामुळे शरीरात ताकद येते आणि काही पोषक घटक देखील शरीराला मिळतात. याशिवाय ते खाणं चांगलं असतं अशी आपण आपल्या घरात ऐकलंच असेल. पण नेमकं गाय किंवा म्हैस, कोणाच्या दुधापासून बनवलेले तूप जास्त आरोग्यदायी आहे, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला असणार. आयुर्वेदानुसार, कोणते तूप आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे, ते माहीत करून घेऊ..

म्हशीच्या तुपाचे फायदे काय?

आपण म्हशीचं तूप खाल्लं असेल तर माहीत असेल की, म्हशीचे तूप हे पांढरे दिसते. महत्वाचं म्हणजे म्हशीच्या दुधाचा चहा जरी छान लागत असला तरी गाईच्या तूपाच्या तुलनेत म्हशीच्या तूपाचे आरोग्यदायी फायदे कमी आहेत, असं म्हणतात. म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या तुपात मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व पोटॅशियमसारखे पोषक घटक आढळतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी म्हशीचं दूध व तूप कधीतरीच खावं पण नियमित सेवन टाळावं, कारण म्हशीच्या तुपात फॅटचे प्रमाण खूप असते, म्हणून ज्यांना चरबी, वजन वाढवायचं आहे त्यांनीच हे तूप खावं. वजन कमी करायचे आहे त्यांनी अगदी कमी प्रमाणात कधीतरीच म्हशीचे तूप खावे.

गाईच्या तूपाचे फायदे काय?

गाईचे तूप म्हणजे बहुतांश लोक आज घरात वापरत असतील. गावरान तूप तर आज लोक घरीदेखील करू लागले आहेत. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्लं जातं. या गाईच्या तुपामुळे आपल्या शरीराची चरबी वाढण्याची भीती नसते, कारण गाईच्या तुपात फॅटचे प्रमाण कमी असते. गाईच्या तुपाचा रंग पिवळसर दिसतो. हे तूप आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम असे चांगले पोषक घटक पुरेश्या प्रमाणात असतात, जे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात. यामुळे लोक गाईच्या दुधाचा आणि तुपाचा लोक जास्त वापर करतात.