October 2, 2022

अदार पुनावालांचा इलॉन मस्क यांना जबरदस्त सल्ला; ज्याचा भारतीयांना होणार महत्वाचा फायदा

गेल्या महिन्यात स्पेसेक्सचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्वीटर विकत घेतले. या खरेदीची चर्चा सोशल मीडियापासून तर उद्योजक जगतात खूप रंगली. कारण सर्वात प्रभावी आणि गांभीर्याने घेतले जाणारे सोशल मिडिया म्हणून ट्वीटरकडे पाहिले जाते, त्यातही हेच माध्यम जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने विकत घेतले, तेही 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3368 अब्ज रुपये) इतक्या मोठी किमतीला. आता या घडामोडीनंतर एक अजून महत्वाची बातमी उद्योग जगतातून समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनी थेट मस्क यांना सल्ला दिला आहे तोही  ट्वीटरवरून.

हॅलो मस्क, तुम्ही अजून ट्विटरची खरेदी पूर्ण केली नसेल, तर भारतात टेस्ला कारच्या हाय क्वॉलिटी लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही भांडवल गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक असेल, असे म्हणत अदार पूनावाला यांनी ट्वीट केले आहे.

अनेक लोक ट्वीटर डीलला महागडे म्हणत होते. उद्योग तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्क एवढ्या पैशात काहीतरी चांगले विकत घेऊ शकले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत जवळपास निम्म्यावर आली होती आणि अशा परिस्थितीत बोर्ड सदस्यांना इलॉन मस्क यांची ही ऑफर नाकारता आलेली नाही. आता अदार पूनावाला यांनी मस्कला ट्विटरऐवजी भारतात टेस्लाच्या प्लांटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही दिला आहे.