January 27, 2023

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, या दिवशी मतदान

संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. दिवाळीपूर्वी निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडून निकालही जाहीर होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

निवडणूक अर्जाच्यावेळी गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नरज असणार आहे. तसेच या निवडणुकीत पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी खास खबरदारी घेण्यात आली असून तशी पथके स्थापन करण्यात आली आहेत. नक्षल भागातील गडचिरोली, गोंदियात विशेष सुरक्षा व्यवस्था असेल.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम:-

*अर्ज भरण्याची तारीख – २७ सप्टेंबर

*अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर

*अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ८ ऑक्टोबर

* मतदानाचा दिवस – २१ ऑक्टोबर

*निवडणूक निकाल – २४ ऑक्टोबर