विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जाहीरनाम्यात दहा रुपयांमध्ये थाळी देण्याचे वचन देण्यात आले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील या थाळीचे उदघाटन होणार आहे. याचा शुभारंभ बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये होणार आहे. आज दुपारी या थाळीचा शुभारंभ झाला आहे.
मुंबईच्या महापौर महापौर किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखाताई राऊत, पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात याची घोषणा केली होती. त्यामुळे आता शिवसेनेने आपला शब्द खरा करून दाखवल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र याचा दर्जा सांभाळण्याचे देखील आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
दरम्यान, भाजपने देखील आपल्या जाहीरमान्यात ५ रुपयांमध्ये थाळी देण्याचे वचन दिले होते. मात्र शिवसेनेने आघाडीबरोबर सरकार स्थापन केल्याने भाजपच्या या योजनेला मोठा धक्का बसला आहे. मात्र आता शिवसेनेची हि थाळी किती दिवस चालते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.