May 28, 2023

गणपती पुळेबद्दल ही गोष्ट माहीत आहे का

गणपती पुळे

कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण असलेले गणपतीपुळे हे छोटेसे सुंदर गांव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सुंदर समुद्र, चंदेरी वाळूचा लांबच लांब किनारा, नारळी पोफळीची बने आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ४०० वर्षांचे जुने स्वयंभू गणेश मंदिर ही या गावाची काही वैशिष्ठ्ये सांगता येतील. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या या छोट्याशा गावी मुंबई, पुणे , कोल्हापूर येथून जाण्यासाठी चांगल्या सोयी आहेत.

समुद्राची शांत गाज, मंद मंद वारा, डोंगर उशाशी घेऊन बसलेले गणेश मंदिर, चाहोबाजूने हिरवाई असलेले हे गांव खास कोकणी खेडे आहे. पर्यटकांच्या वर्दळीमुळे आता अनेक हॉटेल्स, दुकाने झाली असली तरी त्याचे मुळचे कोकणी सौदर्य अजून तरी कमी झालेले नाही. अरूंद रस्ते, लाल माती, वैशिष्ठ्यपूर्ण कौलारू घरे, स्वच्छ परिसर, नारळी, पोफळी, कोकम, केळी, आंबे, फणस, जायफळे अशी विविध वृक्षसंपदा अंगावर लेवून गणपतीपुळे सजलेले आहे.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ४०० वर्ष जुने गणपती मंदिर प्रथम पाहायला हवे. स्वयंभू म्हणजे आपोआप गणपतीचा आकार घेतलेली येथील मूर्ती अशा प्रकारची एकमेव मूर्ती आहे. गणपती म्हणजे गणांचा, लष्कराचा देव आणि पुळे म्हणजे वाळूचा किनारा यावरून या गावाला हे नांव पडले आहे.

टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर असून मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. पश्चिम घाटाचा रक्षणकर्ता म्हणून ही मूर्ती पश्चिमाभिमुख असल्याचे सांगितले जाते. या गणपतीला प्रदक्षिणा घालायची म्हणजे या संपूर्ण डोंगराचीच प्रदक्षिणा करावी लागते आणि भाविक ती मोठ्या श्रद्धेने घालतातही.