December 6, 2022

उदयनराजेंचा राष्ट्रवादी ला लवकरच निरोप; तारीखही ठरली………. !

पुणे दि.२९-:* सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांना खासदारकीचा राजीनामा देण्याचा निरोप भाजपकडून देण्यात आला आहे. त्यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी उदयनराजेंची खलबते सुरू आहेत. तसेच, त्यांच्या प्रवेशाची तारीखही निश्चित केली असल्याचे सांगण्यात येत असून 01 सप्टेंबर रोजी ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आठ- दहा दिवसांपुर्वी पूरग्रस्तांचे निमित्त साधत उदयनराजे मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी निवेदन देण्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर सर्व उदयनराजे समर्थकांना बाहेर थांबण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे यांच्यात बराचवेळ चर्चा झाली.

या चर्चेत फडणवीसांनी त्यांना भाजपप्रवेशाची ऑफर दिली. तुमच्या नावाला साजेसा मानसन्मान ठेवू, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे भोसले यांच्यासोबत आणखी काही नेत्यांचाही प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उदयनराजे- फडणवीस चर्चेवेळी निवडणूक प्रक्रियेसंबंधी माहितीगार अधिकारी वर्षा बंगल्यावर बोलावून घेण्यात आला होता. उदयनराजेंनी आता राजीनामा दिला तर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर होईल कां, याची विचारणा त्या अधिकाऱ्याला करण्यात आली.

मात्र तातडीने उत्तर मिळाले नाही. त्यामुळे केंद्रिय निवडणूक आयोगाकडून माहिती घेवू आणि त्यासंबंधी कळवू, असे उदयनराजेंना सांगण्यात आले होते.

या बैठकीनंतर बरीच उलथापालथ सुरू आहे. उदयनराजेंनी भाजपप्रवेशाचे संकेत देणे सुरू केले आहे. पोटनिवडणूक सोपी जावी, म्हणून गाठीभेटीही सुरू केल्या आहेत, मात्र पोटनिवडणुकीसदर्भात त्यांना भाजपकडून काही निरोप येत नव्हता. अखेर तो निरोप काल रात्री मिळाला.

पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबर शक्य असल्याचे त्यानंतर सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजेंनी अंतिम निर्णयासाठी खलबते सुरू केली आहेत.