January 26, 2023

मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे का म्हटले जाते? हे खरं आहे का?

गेल्या जवळपास चार ते पाच दशकांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणातील कळीचा मुद्दा म्हणजे भूमिपुत्रांचे हक्क आणि भूमिपुत्रांसाठीचे रोजगार आहे .महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगारांवर परप्रांतीयां कडून गदा आणली जाते असे आरोप करत प्रत्येक राजकारणी आपली स्वार्थाची पोळी भाजून घेतांना दिसत आहे. मात्र तरीही महाराष्ट्रीय तरुणांच्या बेरोजगारीची संख्या घटण्याची चिन्हे दिसत नाहीत  यावर महाराष्ट्रातील जनतेचा सूर हा असा असतो की परप्रांतियांचा लोंढा महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकर्‍यांवर गदा आली आहे तर परप्रांतीयांचा असा सूर असतो की महाराष्ट्रीयन तरुणांची मानसिकता ही केवळ नऊ ते पाच असे काम करून ठराविक रकमेचा पगार महिन्याच्या शेवटी घेणे हीच असते.

त्यामुळे ते चाकोरीबद्ध काम करण्याला प्राधान्य देतात. मात्र अन्य प्रांतांमधील तरुण हे पडेल ते काम करून शून्यातून विश्व निर्माण करतात. बऱ्याचदा असे म्हटले जाते की महाराष्ट्रीय माणूस हा व्यवसायामध्ये अपयशी ठरतो कारण महाराष्ट्रीय माणूस हा परस्परांना मदत न करता एकमेकांचे पाय खेचण्या मध्ये पुढे असतो .मात्र या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का याची पडताळणी केली असता अनेक मोठ्या उद्योगांचे सर्वेसर्वा हे महाराष्ट्रीय माणूसच आहे असे दिसून येते व ही उदाहरणे नव्या पिढीतील होतकरू तरुणांना जोमाने कामाला लागून परिश्रमाच्या आधारावर केवळ नोकरीच्या भरवशावर न राहता कल्पकतेने नवनवीन उद्योग उभारण्यास प्रेरणा देऊ शकतात.आज आपण अशाच काही महाराष्ट्रीयन उद्योजकांची माहिती घेणार आहोत ज्यांनी संपूर्ण जगात भारताला उद्योग जगात नावलौकिक मिळवून देण्यामध्ये योगदान दिले आहे.

श्रीयुत लक्ष्मणराव किर्लोस्कर :अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणणाऱ्या व अभियांत्रिकी क्षेत्राच्या मदतीने मुख्यत्वे शेतकऱ्यांची अडचण ओळखून शेतीशी निगडित अवजारे निर्माण करणाऱ्या किर्लोस्कर ग्रुपचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे एक महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व होते .सुरुवातीला सायकलच्या दुकानापासून  व्यवसायाचा श्रीगणेशा करून एक आघाडीचे उद्योजक होण्यापर्यंतची किर्लोस्कर यांची गाथा ही निश्चितच प्रेरणादायी आहे.

श्रीयुत विवेक रणदिवे :अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली मधील टिबको भारतीय सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक हे महाराष्ट्रीयन असलेले श्री विवेक रणदिवे आहेत .टिबको ही संपूर्ण जगभरातील एक नावाजलेली सॉफ्टवेअर कंपनी असून रणदिवे यांचे सॉफ्टवेअर क्षेत्रासोबतच बास्केटबॉल क्षेत्रातही भरघोस योगदान आहे

श्री चंद्रकांत मोरडे :संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत जिभेवर चव रेंगाळणार्या चॉकलेट्सची सर्वात मोठी सप्लाय करणाऱ्या कंपनीचे म्हणजेच मोर्डे फूड सप्लाय कंपनीचे मालक चंद्रकांत मोरडे हे महाराष्ट्रीयन आहेत.

श्री  नितीन परांजपे: मुळात डच उत्पादक असलेल्या हिंदुस्तान लिव्हर या निरनिराळ्या प्रकारची साबण ,डिटर्जंट, लिक्विड व खाद्यपदार्थांची उत्पादने करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महाराष्ट्रियन असलेले श्रीयुत नितीन परांजपे आहेत.

श्री राजेंद्र पवार: जगभरातील जागतिक स्तरावरील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी असलेल्या एनआयआयटीचे सहसंस्थापक श्रीयुत राजेंद्र पवार हे सुद्धा महाराष्ट्राच्या मातीतच वाढलेले आहेत.

श्री विठ्ठल कामत ःभारतीय खाद्य संस्कृतीला एका नव्या ढंगात हॉटेल चेन्सच्या च्या स्वरूपात पेश करणाऱ्या विठ्ठल कामत यांचे मूळ हे मराठी मातीच्या अंतरंगात दडलेले आहे इथूनच प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या खाद्य भ्रमंतीला सुरुवात केली आहे.

श्री बाबा कल्याणी: पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत फोर्ज ह्या वाहन,तेल,खाणकाम ,संरक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कंपनीचे संस्थापक बाबा कल्याणी हे महाराष्ट्रीयन आहेत.

श्री आबासाहेब गरवारे :वाहन उद्योगापासून प्लास्टिक उद्योगा पर्यंत अगदी काळाच्या पुढे जाऊन द्रष्टेपणाने उद्योग क्षेत्रात भरारी घेणाऱ्या गरवारे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आबासाहेब गरवारे हे महाराष्ट्रीयन आहेत.