December 6, 2022

नवीन वर्षाच्या संकल्पा विषयी जाणून घेऊ काही गोष्टी

येत्या काही तासांमध्येच आपण 2019 ला बाय बाय करून 2020 मध्ये प्रवेश करणार आहोत. 2020 चे जल्लोषात स्वागत करत असताना या नवीन वर्षाची सुरुवात काही नवीन संकल्प करून करण्याचे मनसुबे कित्येकांनी काही महिने किंवा काही आठवडे अगोदरच आखले असतील . नवीन वर्षातील संकल्प हे प्रत्यक्षात अमलात येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे असे मानले जाते. व त्यामुळेच नवीन वर्षाच्या संकल्पांवर सोशल मीडियावर अनेक जोक आपल्याला दिसून येतात .नवीन वर्षाचे संकल्प हा आधुनिक युगातील एक ट्रेंड नसून यामागे मध्ययुगीन काळाची ही पार्श्वभूमी आहे .नवीन वर्षाचे संकल्प करण्याची प्रथा नक्की कशी सुरु झाले हे आपण जाणून घेऊयात.

मध्ययुगीन काळामध्ये मुख्यत्वे पश्चिम ध्रुवावर संकल्प करण्याची प्रथा अस्तित्वात होती मात्र नंतर ही प्रथा पूर्व ध्रुवा वरही सुरू करण्यात आली. नवीन वर्षाचा संकल्प करण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यक्ती आपल्याला नको असलेल्या किंवा समाजामध्ये वाईट मानला गेलेला एखादा गुण किंवा वर्तन बदलून स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी एखादा निश्चय नवीन वर्षासाठी करत असे. बाबीलोनियन आपल्या ईश्वराकडे कर्ज घेतलेली सर्व रक्कम परत करण्याचे वचन नवीन वर्षाच्या सुरुवातीला देत असत. रोमन्स आपल्या ईश्वराकडे नवीन वर्षाच्या सुरुवातीला वचनपूर्ती करण्याचे मान्य करत असत.

जागतिक मंदीच्या काळात अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन वर्षाच्या संकल्पांचा पायंडा पडला. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणाच्या आधारे जे लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करणे, व्यायाम करणे किंवा आरोग्याशी निगडित काही संकल्प करतात त्यांचे यशस्वी होण्याचे प्रमाण जवळपास 40 टक्क्यांच्या आसपास आहे.

संपूर्ण जगभराप्रमाणे भारतातही संकल्प करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हे संकल्प पूर्ण होण्यासाठी कोणताही संकल्प करताना तो वास्तवाला धरून व आपल्या आवाक्यात असणे गरजेचे ठरते. नवीन वर्षाचा संकल्प यशस्वी होण्यासाठी पुढील काही गोष्टींचे भान राखणे नक्कीच मदतीचे ठरेल

1. नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण करतांना कोणत्याही बदलासाठी आपले मन व शरीर दोन्ही तयार करण होणे सर्वप्रथम गरजेचे आहे.

2. तुमच्या नवीन वर्षाच्या संकल्पना जवळचे मित्र,नातेवाईक सोबत मनमोकळेपणाने शेअर करा जेणेकरून आपण जेव्हा चलबिचल होतो तेव्हा या व्यक्तींसोबत चर्चा करून संकल्पावर ठाम राहणे सोपे जाते.

3. तुमच्या आवडीच्या व तुम्हाला रस असलेल्या गोष्टींबाबत संकल्प करा जेणेकरून ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशी प्रेरणा तुम्हाला आपोआपच मिळेल.

4. संकल्प करताना एक निश्चित ध्येय मनात ठेवा.

5. तुम्हाला नवीन वर्षामध्ये पूर्ण करायचे संकल्प हे एकत्र मांडून नेहमी तुमच्या सोबत बाळगा जेणेकरून तुम्हाला ज्या क्षणी आपण संकल्प पूर्ण करण्यात कमी पडत आहोत असे वाटते त्या क्षणी सकारात्मकता निर्माण होण्यास साहाय्य मिळते.

6. नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण करण्यामध्ये जर आपण कुठे मागे पडत आहोत असे वाटत असेल तरीही न्यूनगंड बाळगू नका व वेळोवेळी आपण संकल्प पूर्ण करण्यामध्ये किती प्रगती केली आहे याचे मूल्यांकन करत राहा.