March 16, 2023

रस्त्यावर भाजी विकण्यापासून ते लंडनमध्ये खानावळ जाणून घ्या या ‘मराठमोळ्या’ आजीबाई यांची प्रेरणादायी कहाणी

भारतीय स्त्रीचे सक्षमीकरण ही संज्ञा केवळ आधुनिक काळात रुढ झाली  नसून फार पूर्वीपासून भारतीय स्त्रियांना आलेल्या परिस्थितीवर मात करून इच्छाशक्तीच्या व कष्टाच्या जोरावर समाज व्यवस्थेच्या विरुद्ध निरनिराळ्या अडथळ्यांची शर्यत पार करुन आपले वारू किनार्‍याला लावल्याची उदाहरणे नेहमीच प्रेरणा देत असतात .असेच एक उदाहरण म्हणजे ज्या ब्रिटिशांनी भारताला गुलाम बनवले होते व जे आपल्या खानपानाच्या पद्धतीबद्दल अत्यंत काटेकोर आहेत अशा ब्रिटिशांना आपल्या मराठमोळ्या पदार्थांची चव चाखायला लावण्याचे कसब साध्य करणाऱ्या राधाबाई वनारसे.राधाबाई वनाळसे  या वनारसे खानावळीच्या संस्थापक होत.

राधाबाई यांच्यावर दुःखाची कुऱ्हाड अगदी अल्प वयापासूनच कोसळली होती. अगदी लहान वयातच  त्यांच्या नशिबी वैधव्य आले. त्यावेळी त्यांच्या पदरात पाच मुलींची जबाबदारी होती .आपल्या मुलींच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी कुठलेही शिक्षण नसल्यामुळे रस्त्यावर भाजी विकण्याचा व्यवसाय चालू केला .त्याच वेळी अठराविश्वे दारिद्र्य संपून आणि वैधव्याचा कलंक मिटवण्यासाठी इंग्लंडहून एक विधुर माणूस एका नातेवाईकाच्या मध्यस्थीने लग्नासाठीचा प्रस्ताव घेऊन आला.

गडबडीमध्ये या दोघांचे लग्न लावण्यात आले आणि पाच पैकी दोन मुलींना घेऊन तो माणूस राधाबाईंसह इंग्लंडला आला. इंग्लंडमध्ये या माणसाची आधीच्या लग्नापासून ची मुले होती ज्यांनी राधाबाईसोबत लग्न स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. त्या परिस्थितीमध्ये राधाबाई कशीबशी आपला संसार ओढत होत्या मात्र नियतीला काहीतरी वेगळेच हवे होते आणि दुसऱ्यांदा राधा बाईंवर वैधव्याचा शाप उलटला .राधाबाई यांच्या दुसऱ्या पतीचे अगदी छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले.

ज्याच्या भरवशावर राधाबाई इंग्लंडमध्ये आल्या होत्या तो पतीच राहिला नाही तेव्हा त्याच्या मुलांनी राधाबाई यांच्या हातामध्ये बोटीची तिकीटे ठेवली आणि त्यांना पुन्हा भारतात जाण्याचा सल्ला देऊन  थंडीच्या दिवसांमध्ये घराबाहेर काढले. लंडन सारख्या अनोळखी शहरांमध्ये कोणतीही ओळख नसताना आपल्या दोन मुलींसह आता नक्की काय करायचे या संभ्रमात त्या उभ्या असताना समोरच्या घरातून एक देवदूत समोर आला .एका ज्यू व्यक्तीच्या रुपाने त्या देवदूताने त्यांना आपले घर राहण्यासाठी दिले व घरासमोरच्या मोकळ्या जागेत खानावळ टाकण्यास सांगितले.

राधा बाईंच्या हाताला चव होती व या कौशल्याचा पुरेपूर वापर करत त्यांनी लंडनमध्ये मराठमोळ्या पदार्थांची वनारसे खानावळ सुरू केली. या ठिकाणी सुरुवातीला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे .लंडनला शिकायला गेलेल्या, नोकरीनिमित्त गेलेल्या एकट्या राहणाऱ्या पुरुषांची राधाबाई यांच्या खानावळी मध्ये जेवणासाठी प्रचंड गर्दी होत असे. नंतर त्यांनी काँट बेसीसवर राहायला सुद्धा जागा देणे सुरू केले. हळू हळू त्यांचे सुबत्तेचे दिवस आले. लंडनमध्ये त्यांची पाच घरे होती.सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांनी लंडनमध्ये आपले योगदान दिले .लंडनमध्ये गणेशोत्सव राधा बाईंनीच सुरू केला .त्याचप्रमाणे लंडनमध्ये पहिले हिंदू मंदिरही राधा बाईंनीच बांधले .

लंडनमध्ये आल्या तेव्हा अगदीच अशिक्षित ,व्यवहार ज्ञानापासून दूर असलेल्या राधाबाई या नंतर स्वतः मेट्रोने प्रवास करत असत.मात्र भारतीय संस्कृतीची ओळख असलेली नऊवारी साडी नेसणे त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सोडले नाही. भारतातून लंडनमध्ये गेलेल्या मराठी माणसाने अन्य ठिकाणां सोबतच त्यांच्या खानावळी मध्ये जाऊन त्यांच्या पदार्थांची चव चाखणे हा जणू एक शिरस्ताच होता. पु ल देशपांडे ,आचार्य अत्रे यांच्यासारखे दिग्गज सुद्धा त्याकाळी त्यांच्या खानावळी मध्ये जाऊन जेवून आले होते. लंडनच्या राणीने सुद्धा त्यांच्या कार्याची दखल घेतली होती व त्यांच्या अंत्ययात्रेला लंडनच्या सरकारी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.