विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दुसऱ्या ग्रहांवरील रहस्ये उकलून काढण्यासाठी भारतीय विज्ञान भरारी घेत असताना आजही समाज मनामध्ये काही रहस्य ही मिथकांच्या स्वरूपात प्रचलित आहेत .या प्रथांना धक्का लावला तर समस्त मनुष्यजातीचा विनाश ओढवेल किंवा काहीतरी मोठे संकट येईल या भीतीपोटी सुशिक्षित लोकही त्यांचे काटेकोरपणे पालन करताना दिसतात। काही रहस्य ही निश्चितच अनाकलनीय आहेत. ज्यांच्या खोलात जाणे हे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाला ही अद्याप शक्य झालेले नाही. भारतातील काही जागांवरील अशीच सांगितली जाणारी रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.
१. रहस्यमय गोष्टींनी भरलेले मंदिर:
भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्या ठिकाणी प्राचीन कथांचा आधार घेऊन काही रहस्ये दडलेली आहेत असे पूर्वापार मानले जाते. या मंदिरांपैकी एक म्हणजे केरळ येथील श्री पद्मनाभ मंदिर . श्री पद्मनाभ मंदिरामध्ये सात तळघरे आहेत व या तळ घरांमध्ये मोठ्या प्रमाणात खजिना ,संपत्ती दडून ठेवलेले असल्याचे सांगितले जाते. भारतीय पुरातत्व विभागातर्फे केलेल्या उत्खननामध्ये या सात तळ घरांपैकी 6 तळ घरांमधील जवळपास एक लाख करोड ची संपत्ती बाहेर काढण्यात आली आहे. मात्र सातवे तळघर हे कुठल्यातरी मंत्राने बंदिस्त करण्यात आले आहे असा राजघराण्याचा दावा आहे.म्हणूनच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राजघराण्याने हे सातवे तळघर बंद ठेवण्यासाठी चे आदेश मंजूर करून आणले आहेत. श्री पद्मनाभ मंदिराच्या सातव्या तळ घराला बंद ठेवण्यामागे नक्की काय रहस्य आहे हे आजही ज्ञात झालेले नाही.
२. व्रूंदान:
व्रूंदानातील निधीवन परिसरात असलेल्या रंग महालाचे दार रात्री आपोआप बंद होते व सकाळी उघडते असे सांगितले जाते.रंग महालातील शयनकक्षात रात्री भगवान श्रीकृष्ण वास्तव्यास असतात असे आजही मानले जाते। म्हणूनच या मंदिराचे पुजारी रात्री रंगमहालाचा दरवाजा बंद होण्यापूर्वीच शयनकक्षात लश लोण्याचा प्रसाद नेऊन ठेवतात. सकाळी शयन कक्षामध्ये रात्री कोणीतरी वास्तव्यास होते अशा खुणा निदर्शनास येतात व प्रसादही खाल्लेला असतो .याच कक्षामध्ये रात्रीच्या प्रहरास कोणासही येण्यास मज्जाव असतो. अगदी पशुपक्षी देखील या कक्षामध्ये वास्तव्य करू शकत नाही. त्यामुळे या कक्षामध्ये संध्याकाळी ठेवलेला प्रसाद नक्की कोण ग्रहण करते व तेथे रात्री कोण वास्तव्यास असते हे एक रहस्य आहे. असे मानले जाते की रात्रीच्या वेळी जो या कक्षामध्ये प्रवेश करतो त्याला या मोहमाया पलीकडच्या जगामध्ये म्हणजेच मृत्यूला आधीन व्हावे लागते. त्यामुळे आजपर्यंत कोणीही या कक्षामध्ये संध्याकाळनंतर प्रवेश करण्याचे धैर्य केले नाही.
३. अश्वत्थामा:
महाभारतातील कौरवांच्या बाजूने असलेला द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा यांना भगवान श्रीकृष्णाच्या शापामुळे आजही पृथ्वीचे प्रदक्षिणा करत भटकंती करावी लागत आहे असे मानले जाते. अश्वत्थाम्याच्या कपाळावर झालेल्या खोल जखमेवर लावण्यासाठी तेल व हळद मागत तो फिरत असल्याचे अनेकदा सांगितले जाते।मात्र या दाव्यांना कोणतेही ठोस व प्रामाणिक प्रमाण आजपर्यंत देण्यात आलेले नाही. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यजवळील असिरगड किल्ल्याजवळ असलेल्या शिवमंदिर मध्ये अश्वत्थामा आजही पूजेसाठी येत असल्याच्या कथा स्थानिकांकडून सांगितल्या जातात मात्र अश्वत्थाम्याच्या प्रत्यक्ष वास्तव्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे अश्वथामा आजही पृथ्वीवर भटकत आहे का हे एक रहस्य आहे.
४. द्वारका:
भगवान श्रीकृष्णांनी वसवलेल्या द्वारका नगरी चे समुद्रातील अवशेष हेसुद्धा पुरातत्व विभागासाठी एक प्रकारचे आव्हानच मानले जाते.महाभारतातील वर्णनाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये महाप्रलय आला होता. या प्रलयामध्ये द्वारका नगरी बुडून गेली. या ठिकाणी समुद्रामध्ये आजही एका नगरीचे अवशेष सापडतात मात्र ही नगरी म्हणजे श्रीकृष्णाची द्वारकाच आहे का हे रहस्य आजही इतिहासकार व पुरातत्व खात्याला उलगडता आलेले नाही. 2005 साली नौदलाच्या मदतीने श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या ठिकाणी समुद्र तळावर असलेले ऐतिहासिक पुरातत्व नमुने गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहिमेमध्ये काही झाडांचे भग्न नामशेष व बांधकामाशी निगडीत नमूने सापडले.मात्र त्यांच्या आधारावर हे अवशेष नक्की कोणत्या काळातील आहेत हे स्पष्ट करता आले नाही. आजही श्रीकृष्णाच्या द्वारकेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच आहे.
५. कैलाश पर्वत :
कैलास पर्वतावरील यतीचे अस्तित्व हीसुद्धा एक रहस्यमय कल्पना आहे. कैलास पर्वत पृथ्वी आणि आकाश यांच्यामधील एक मध्यबिंदू मानला जातो. त्याच्या चारही बाजूंना सिंधू ,ब्रह्मपुत्रा, सतलज व कर्णाली.या चार नद्यांचा संगम आहे. व याच्या दोन बाजूंना मानसरोवर हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाणारे गोड्या पाण्याचे सरोवर असून दुसऱ्या बाजूस राक्षस सरोवर हे खाऱ्या पाण्याचे अर्थातच नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाणारे सरोवर आहेत. कैलास पर्वताचा आकार हा पिरँमिडसारखा असून याच्या ऊर्जेच्या संपर्कात येणे हे वैज्ञानिक दृष्ट्या फायद्याचे आहे असे संशोधकांनी सांगितले आहे. कैलास पर्वतावरील गुहांमध्ये योगी ध्यान करतात व त्यांच्यासोबत यती अर्थातच हिममानवाचा ही वावर आहे अशा कथा सांगितल्या जातात. मात्र यतीचे वास्तव्य ही एक गूढ कथाच आहे त्याला शास्त्रीय प्रमाण नाही.
६. जतिंगा गाव :
आसाम मधील जतींगा हे गाव पक्ष्यांच्या सामुहिक आत्महत्यांसाठी चर्चेत आहे. याठिकाणी पक्ष्यांचे थवेच्या थवे येऊन मरण पावतात. अशाप्रकारे पक्षांनी सामुहिकरित्या मरणाला कवटाळण्याचे नक्की कारण काय याचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही.