May 29, 2023

मुली वयात येताच मुलींच्या शरीरामध्ये होतात ‘हे’ महत्वाचे बदल

मानवी शरीराच्या वाढीचे निरनिराळे टप्पे असतात जसे नवजात शिशु ,बालक, बाल्यावस्था,पौगंडावस्था ,तारुण्यावस्था .या सर्व वाढीच्या चक्रामध्ये पौगंडावस्थेला खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण पौगंडावस्थेत मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येत असतात. पौगंडावस्थेत मुलगा आणि मुलगी या दोन्हींच्याही शरीरामध्ये बदल घडून येतात मात्र हे बदल घडून येण्याचे वय आणि बदलांचे स्वरूप हे लिंग परत्वे भिन्न असते.आज आपण पौगंडावस्थेमध्ये मुलींच्या शरीरामध्ये नेमके काय बदल घडून येतात व या वयातील मुलींना येणाऱ्या समस्यांना पालकांनी कसे हाताळावे हे जाणून घेणार आहोत.

पौगंडावस्थेमध्ये होणारे बदल हे प्रत्येक मुलीच्या बाबतीत एकाच वेळी घडून येतील असे नाही.काही मुलींमध्ये हे बदल संथ गतीने होतात तर काहींमध्ये खूप लहान वयातच हे बदल घडून येतात. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पौंगडावस्थेतील बदल हे खुप लहान वयापासूनच म्हणजे आठ ते 13 या वयोगटात सुरू होत असल्याचे दिसून येते.

मुलींमध्ये पौगंडावस्थेत होणारा सर्वात पहिला बदल म्हणजे स्तनांमधील होणारे बदल.या अवस्थेमध्ये मुख्यत्वे स्तनाग्र आणि त्याच्याभोवतीच्या भागांमध्ये वाढ होताना दिसून येते. मुलींमध्ये स्तनां मध्ये होणारे बदल हे पौगंडावस्थेत सुरू होऊन  वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत चालू राहतात.

स्तनांमध्ये होणाऱ्या बदलानंतर मुलींच्या हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे जननेंद्रिय, काख आणि शरीरावर उगवणाऱ्या केसांमध्ये ही वाढ होते.मुलींना सुरुवातीला जननेंद्रियांच्या भोवताली केसांचे वाढ सुरू होते व वयाच्या साधारण बाराव्या वर्षी काखेमध्ये केस येण्यास उगवण्यास सुरवात होते.

पौगंडाअवस्थेमध्ये मुलीं मध्ये होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे मासिक पाळीची सुरुवात होय. प्रत्येक मुलीमध्ये मासिक पाळी सुरू होण्याचे वय हे भिन्न असते.तरीही मासिक पाळी सुरू होण्याचा सर्वसाधारण वयोगट हा दहा ते सोळा वर्षे इतका असतो.

पौगंडावस्थेमध्ये मुलींमध्ये केवळ शारीरिकच नव्हे तर सामाजिक आणि मानसिक बदलही मोठ्या प्रमाणात घडून येत असतात. या अवस्थेमध्ये मुली आपल्या स्वतःची अशी काही निश्चित ध्येय ठरवतात. सामाजिक विषय , तत्वज्ञान आणि राजकारणाविषयी काही मुलींमध्ये या अवस्थेत रस निर्माण होतो.

या अवस्थेमध्ये स्वतःच्या शरीराविषयी मुलींमध्ये अति जागरूकता निर्माण होते व यातूनच आपल्या आसपासच्या मुलींसोबत तुलना करण्याचे प्रमाणही वाढू शकते. काही मुलींमध्ये आपल्या शरीराविषयी या अवस्थेत न्यूनगंड निर्माण होतो.

पौगंडावस्थेत मुलींना आपल्या आई-वडिलांनी लादलेली बंधने किंवा नियम हे नकोसे वाटतात व त्या काही प्रमाणात आई-वडिलांपासून स्वातंत्र्याची भाषा बोलू लागतात. या अवस्थेमध्ये पालकांपेक्षा ही मित्र-मैत्रिणींचा प्रभाव मुलींवर जास्त असतो.प्रेमविषयक कल्पना, प्रेम संबंधांविषयी आकर्षण या वयातच निर्माण होते.

पौगंडाअवस्थेत शरीरात निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या हार्मोन्समुळे मुली या काहीप्रमाणात संभ्रमावस्थेत असतात. या अवस्थेमध्ये एखादा न्यूनगंड मनात निर्माण झाला तर तो पुढील आयुष्यामध्ये घातक ठरू शकतो .त्यामुळे या अवस्थेमध्ये मुलींना अधिक जास्त प्रमाणात समजून घेणे आवश्यक ठरते. मासिक पाळी सुरू झाली म्हणून मुलींना अतिरिक्त निर्बंध घालण्यापेक्षा तिला नवीन आव्हानांचा स्वीकार करण्यास पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. तिला कोणत्याही शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक समस्या जाणवत असतील तर घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीसोबत ज्याच्या सोबत ती सहजतेने बोलू शकते अशा व्यक्तीसोबत आपल्या समस्या मांडाव्यात यासाठी निकोप वातावरण कुटुंबात निर्माण केले पाहिजे .मुलीला हवा तेव्हा जास्तीत जास्त वेळ देण्यासाठी पालकांनी तत्पर राहिले पाहिजे.

कोणत्याही सामाजिक वातावरणामध्ये मुलीने स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचे ध्येय इत्यादींकडे कानाडोळा करता कामा नये याची जाणीव तिला वेळोवेळी करून दिली पाहिजे व यासाठी आवश्यक उत्तेजन दिले पाहिजे. कोणत्याही प्रवाहात वाहवत जाऊ नये यासाठी पौगंडावस्थेतील मुला-मुलींना योग्य ती समज व मर्यादांची जाणीव करून देणे आवश्यक असते.