March 16, 2023

या सवयी सोडा नाहीतर तुम्ही गरीबच रहाल, गरीब व्हाल!

श्रीमंत होणं ही महत्वाकांक्षा असते, गरीब होणं ही असते का ? नाही ना ! पण तरीही आपण स्वतःला गरीब बनवतो, त्या वाटेला लागतो आणि आपल्या खिशाला मोठं छिद्र पडल्याचं आपल्या कधी लक्षात पण येत नाही. कारण आपल्या या 5 सवयी. अशा काही सवयी मला नाहीतच असं कुणी म्हणूच शकत नाही, इतक्या त्या सामान्य आहेत.

1) गरजेपेक्षा खर्च जास्त

आपण पैसे कमवायला लागलो की, आपल्याही नकळत आपल्या गरजा वाढतात. आवडलं की घे असं आपण करतो, गरज नसली तरी वस्तू विकत घेतो. हॉटेलिंग करतो, मजा करतो. मोठेपणा करतो. त्यात खिशाचं तोंड फाटतं.

2) कार्ड है ना

ही आणखी एक वाईट सवय. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड तर असतंच आपल्याकडे. लागले पैसे की गाठ एटीएम. त्यातून होतं काय की पैसे सरसर संपतात. त्यावर शॉपिंग होतं. आणि मग आवक कमी जावक जास्तच होते.

3) बजेट लिहा

आपली आई आणि आजी हिशेब लिहायच्या. पै पै चा खर्च लिहून काढायच्या. मात्र आता होतं असं की आपण लिहित नाही खर्च. मग आपल्याला आपलं बजेटच माहिती नसं.परिणाम तोच पैसा कुठं जातो तेच कळत नाही.

4) रिटायरमेण्टचं काय?

हा तर आपण विचारच करत नाही. पण आपण कधी तरी रिटायर होणार आहोत आणि तेव्हा आपण काय करणार याचा विचार करुन पैसे बाजूला ठेवले नाहीत तर भविष्यात आपलं काही खरं नाही.

5) आणीबाणी

आजारपण, अपघात हे सारं काही सांगून येत नाही. मग होतं तेच. आपलं सारं गणित बिघडतं. आपली बचत संपते. कारण आपल्या पगारातून आपण दरमहा काही पैसे बाजूला ठेवतच नाहीत.