December 6, 2022

तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कुठे असतात जाणून घ्या

इतिहासात घडून गेलेल्या कोणत्याही घटनेची संगती वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न  नेहमीच केला जातो.इतिहासात होऊन गेलेल्या एखाद्या घटनेचा सध्याच्या काळाशी काय धागा आहे किंवा ती घटना घडून गेल्यानंतर त्याच्या काय पाऊलखुणा सध्या अस्तित्वात आहेत हे तपासले जाते किंवा इतिहासातील एखाद्या व्यक्तिमत्वाचा वारसा पुढे चालवणारे वंशज आता कुठे आहेत व ते काय करतात याचा शोध घेतला जातो. संपूर्ण देशभरामध्ये बॉक्स ऑफिस हिट झालेल्या तान्हाजी या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या काय करतात याबद्दलची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना आहे. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे हया अजरामर झालेल्या वाक्यामधील रायबाचे लग्न नंतर कसे झाले व त्यांनी त्या काळात काय केले हेसुद्धा जाणून घेणे तितकेच उत्कंठावर्धक असणार आहे.आजच्या लेखात आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

तानाजी यांचा जन्म सातारा जवळील गोडोली या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव सरदार काळोजी राव होते व आईचे नाव पार्वतीबाई होते .आदिलशाहीच्या एका लढाईमध्ये काळजी राव  धारातीर्थी पडल्यावर शेलार मामांनी तानाजी व सुर्याजी यांना आपल्यासोबत महाड जवळील उमरठे गावामध्ये आणले. तानाजी आणि सूर्याजी सोबत त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई या सुद्धा उमरठे गावामध्ये स्थलांतरित झाल्या. याच काळातछत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे निशाण हाती घेतले होते व अगदीं कोवळ्या वयापासूनच तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये त्यांच्यासोबत सहभागी होऊन त्यांनी वीर पराक्रम ही गाजवला होता.

1665 साली साली मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तहानुसार शिवाजी महाराजांच्या अखत्यारीतील जवळपास 23 गड आणि किल्ले हे मिर्झाराजे जयसिंग यांना देण्यात आले होते. त्यापैकी कोंढाणा अर्थातच सिंहगडावर राजमाता जिजाऊ यांचे विशेष प्रेम होते. या किल्ल्याचा सुभेदार उद्यभान हा त्याठिकाणी जनानखाना चालवत होता त्यामुळे जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला कोणत्याही परिस्थितीत मोगलांच्या ताब्यातून सोडवून घ्यायचा होता.

ही मोहीम फत्ते करण्यासाठी तानाजी मालुसरे पुढे सरसावले त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपला मुलगा रायबाचे अगदी जवळ आलेल्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आले होते .मात्र आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या बाजूला सारत आधी स्वराज्याची जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी प्राधान्य दिले व त्यांनी कोंढाणा किल्ला मोगलांशी धीरोदात्तपणे लढवून स्वराज्याचे निशाण फडकावून शिवरायांच्या चरणी अर्पण केला. ही मोहीम फत्ते करत असताना तानाजी मालुसरे लढता-लढता धारातीर्थी पडले.

आपल्या विर सरदाराच्या स्मरणार्थ छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले. तानाजी मालुसरे  ह्या निधड्या छातीच्या सिंहाच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी शिवरायांनी घेतली.रायबांचे लग्न छत्रपती शिवरायांनी पार पाडले. त्यानंतर दोन वर्षांनी बेळगाव जवळील पारगड च्या किल्ल्याची जबाबदारी ही रायबा यांना सोपवण्यात आली. रायबा यांनी आपल्या वडिलां इतकेच इमानेइतबारे छत्रपती शिवराय व त्यांच्या पुढील वंशजांची सेवा केली. ब्रिटिश काळातही रायबा यांच्याकडे पारगड जवळील किल्ल्याच्या सुभेदारी ची जबाबदारी होती व ती सनद आजही त्यांच्या वंशजांनी जपून ठेवली आहे.

नरवीर तानाजी मालुसरे यांचे सध्याचे वंशज ही त्यांची बारावी पिढी आहेत या पिढीचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉक्टर शीतल मालुसरे या कैलास वासी शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पत्नी असून  त्यांचे पुत्र रायबा हे आहेत.

डॉक्टर शीतल मालुसरे यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएचडी संपादन केली असून त्या महाड येथे शिक्षक क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहेत. तर रायबा हे सध्या शिक्षण घेत आहेत. तानाजी मालुसरे यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी सध्याच्या पिढीला नितांत आदर असून त्यांचे कार्य व त्यांची शौर्यगाथा आजच्या पिढीला ही प्रेरणादायी ठरावी म्हणून डॉक्टर शीतल मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निगडीत निरनिराळ्या विषयावर ऐतिहासिक व्याख्याने व चर्चासत्रांमध्ये सहभागी होत असतात.