May 30, 2023

अवघ्या 342 मावळ्यांसह तानाजी मालुसरे यांनी …

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना निष्ठावंत मावळ्यांच्या फळीने भक्कम साथ नेहमीच दिली. आपल्या राजाचे मुघल फौजांना देशाबाहेर करून स्वराज्यस्थापनेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळोवेळी मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. या कामी येताना अनेक सरदार व मावळ्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवले .छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांच्या बलिदानाची दखल नेहमीच घेतली व  त्यांना अजरामरही केले. इतिहासानेही अशा स्वाभिमानी ,जिगरबाज ,शूर योद्ध्यांची नोंद सोनेरी अक्षरांमध्ये केली आहे. 

आजच्या पिढीला या  योद्ध्यांचे स्मरण करून देणे हे आपल्या इतिहासाविषयी आत्मभान जागृत करण्यासाठी निश्चितच आवश्यक आहे. बॉलिवूड हे आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम मानले जात आहे .10 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणारा तानाजी मालुसरे ह्या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे यांच्या वीरगाथेचे दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तानाजी मालुसरे यांच्या विषयी काही तथ्य आज आपण जाणून घेणार आहोत.

तानाजी मालुसरे यांचा उल्लेख हा प्रामुख्याने सिंहगडाला शर्थीने लढवून त्याला मुघलांच्या ताब्यातून परत आणण्याच्या मोहिमेशी निगडित आहे. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत केलेल्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला मिर्झाराजे जयसिंग यांना दिला होता.मिर्झाराजे जयसिंग यांनी या किल्ल्याचे सुभेदार म्हणून रजपूत असलेल्या उदयभान यास नियोजित केले होते. उदयभानने  इस्लाम धर्म स्वीकारला होता. कोंडाणा किल्ल्याव त्याने जनानखाना सुरू केला होता आपले गड किल्ले हे एक पवित्र तीर्थक्षेत्राप्रमाणे माननाऱ्या जिजाऊसाहेबांना ही गोष्ट खचितच आवडणारी नव्हती.म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून परत मिळवण्यास सांगितले. यावेळी गडावर आपला मुलगा रायबा च्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे आले होते.

तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला परत मिळवून आणण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. यावेळी त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असेही बोलून दाखवले होते.त्याप्रमाणेच  त्यांनी आपल्या 342 मावळ्यांच्या फौजेसह व बंधू सूर्याजी च्या नेतृत्वाखाली कोंढाणा किल्ल्याला घोरपडीच्या साह्याने वर चढून जिंकून आणले. मात्र उदयभानच्या फौजेच बीमोड करत असताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तानाजींच्या मृत्युची बातमी कळताच शिवाजी महाराज कोंढाणा सर करण्याच्या बातमी पेक्षाही तानाजींच्या मृत्यूच्या बातमीने अधिक व्याकूळ झाले. यावेळी दुखःवेगाने त्यांनी म्हटले की ,गड आला पण सिंह गेला , या वाक्या वरूनच सिंहगड हे नाव पडले असेही म्हटले जाते.

तानाजी मालुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोदोली या  ठिकाणी सोळाशे साली झाला.छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे बालपणी एकत्र खेळले होते असे संदर्भ इतिहासात मिळतात.

औरंगजेबाने ज्यावेळी छत्रपती शिवाजी  महाराज व संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने आग्र्याला कैद केले होते तेव्हा तानाजी मालुसरे ही त्यांच्यासोबत होते असे सांगितले जाते.

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या जवळपास सर्वच युद्धांमध्ये त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.

कोंढाणा किल्ला मिळवण्याच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली होती अशावेळी आपल्या शिरपेचाला हाताला गुंडाळून सपासप वार करत त्यांनी मोगल फौजांना धुळ चाटवली.