May 28, 2023

मुली ‘या’ स्वभावाच्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात.

स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भिन्न स्वभाव आणि शारीरिक जडणघडणीचे असतात. स्त्री आणि पुरुषांचे एकमेकांप्रती चे आकर्षण हे सहज व नैसर्गिक बाब आहे .स्त्री आणि पुरुष या दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण एका ठराविक वयात आल्यानंतर वाटणे सहाजिक असते. मात्र बऱ्याचदा चित्रपटांमधून ,कथा कादंबऱ्यांमध्ये पुरुष स्त्रीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळे फंडे वापरत असल्याचे दाखवले जाते .पुरुषांच्या स्वभावाच्या, व्यक्तिमत्वाच्या छटा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक स्त्रीला पुरुषामध्ये वेगवेगळा गुण भावत असतो.स्त्रियांना आकर्षित करणारी पुरूषांची स्वभाववैशिष्ट्य आज आपण जाणून घेणार आहोतः

1) सभ्यताः स्त्रियांचा आदर करणारे ,  स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून स्थान देणारे पुरुष नेहमीच आवडतात असे दिसून आले आहे. आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा कृत्रिमपणा न आणता सरळ, साधेपणाने वागणारे प्रामाणिक पुरुष  महिलांना जास्त भावतात. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खूप पूर्वीपासून मुलांना शूरवीर,साहसी असेच घडवावे असे बिंबवले जाते व त्यातून मुलांनी लाजणे ,रडणे या गोष्टी त्याज्य आहेत असे त्यांच्या मनावर ठाम रुजवले जाते. मात्र कधीकधी महिलांना लाजाळू पुरूषसुद्धा आवडतात.सगळ्यांशी अंतर राखून राहणारे पुरुष आपल्या सोबत मात्र मोकळेपणाने बोलतात ही गोष्ट महिलांना सुखावणारी असते. जंटलमन.पुरुषांनी वेळ पडेल तेव्हा आक्रमकही व्हावे असे महिलांना मनापासून वाटते.

2) स्वाभिमानः कोणत्याही महिलेला स्वाभिमानी पुरुष हा निश्चितच आवडतो. कधीकधी आपल्याला एखादी महिला किंवा मुलगी खूप आवडत असेल मात्र आपण संयमाने तसे दाखवून दिले नाही तर निश्चितच त्या महिलेला काहीसे आकर्षण निर्माण होऊ शकते .एखादी तरुणी किंवा महिला आवडत असेल तर तिच्यासाठी लाचार होऊन जंगजंग पछाडणा-या तरुणाला कोणतीही महिला किंवा तरुणी नापसंत करते.कोणत्याही मुलीला बघून तिची छेड काढणाऱ्या किंवा दुर्व्यवहार करणाऱ्या पुरुषांकडे महिला आकर्षित होऊ शकत नाही. स्वतःच्या विचारांबद्दल, कर्तृत्वाबद्दल संवेदनशील असणे हे कोणत्याही महिलेला आकर्षित करण्यासाठी निश्चितच आवश्यक असते.

3) आक्रमकपणा ः सध्याच्या घडीला निरनिराळ्या चित्रपटांमधून चित्रपटातील नायकांचे दबंग रूप दर्शनास पडते.त्यामुळे काही महिला व तरुणींना आक्रमक स्वभावाचे पुरुष निश्चितच आवडतात मात्र या आक्रमकतेला संयम आणि मर्यादांची किनार लावण्यात कमीपणा जाणवत असेल तर हा दोष त्या पुरुषाने लवकरात लवकर दूर सारणे महत्वाचे आहे.आपल्याला जे वाटते ते मनापासून बोलणे ,सुसंवाद द्वारे आपल्या भावना संबंधित महिला किंवा तरुणी पर्यंत पोहोचणे ही सध्याच्या काळाची स्त्री व पुरुषांमधील देवाणघेवाणीची गरज आहे .ज्यामुळे आजकाल स्त्रियांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांचे प्रमाण कमी होऊ शकते.

4) आयुष्याप्रती गांभीर्य ः  आपल्या आयुष्यातील करिअर ,जबाबदाऱ्या ,एकंदरीत  जीवनाबद्दल गांभीर्याने विचार करणारे पुरुष महिलांना जास्त आवडतात. याउलट केवळ महिलांच्या मागे तू मला कशी आवडते हे सांगत फिरणारे पुरुष महिलांना तिटकारा आणतात. कोणत्याही गोष्टीचा तटस्थपणे विचार करणारे पुरुष महिलांची पहिली पसंती असते. आपल्या आयुष्यातील स्त्रीला मी म्हणेल ती पूर्व दिशा असे मानायला लावणारे पुरुष स्त्रियांना आवडत नाही व त्यांचा स्वीकार त्या केवळ तडजोड म्हणूनच करतात म्हणून आपल्या आयुष्यातील स्त्रीचे बोलणे हे शांतपणे ऐकून घेण्याची सवय पुरुषांनी लावून घेणेही गरजेचे ठरते.

5) काळजी घेणारे पुरुष ःकोणत्याही स्त्रीला पुरूषाने आपली काळजी घेतली म्हणजे आपल्याला वेळ दिला असे वाटते. आजारपण किंवा कुठे बाहेर प्रवासामध्ये जेव्हा स्त्रीला मदतीची गरज असेल तेव्हा न सांगता साहाय्य करणारे पुरुष स्त्रियांना संस्कारी वाटतात. काळजी घेणाऱ्या पुरुषांमध्ये काही स्त्रियांच्या मते प्रशंसा करणारे पुरुष, तिच्या आवडी निवडींची दखल घेणारे पुरुष यांचासुद्धा समावेश होतो.

6) मस्करी करणारे पुरुष ःज्याप्रमाणे कोणताही पुरुष स्त्रीच्या चेहऱ्यावरील  हास्याने प्रभावित होतो अगदी त्याच प्रमाणे कोणतीही स्त्री ही सदैव हसतमुख असलेल्या पुरुषाकडे आकर्षित होते. चारचौघांमध्ये सगळ्यांना हसवणारे, सभोवतालचे वातावरण प्रफुल्लित करणारे पुरुष हे महिलांना आवडतात .चांगली विनोदबुद्धी असणारे पुरुष स्त्रियांचे मन लवकर आणि सहजगत्या जिंकू शकतात.

7) आदर देणारे पुरुषः सार्वजनिक ठिकाणी व वैयक्तिक आयुष्यातही महिलांना पुरुषांनी आदर देणे ही एक काळाची गरज आहे. आधुनिक काळामध्ये स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने बाहेरच्या जगात वावरत आहे अशावेळी आपले म्हणणे व आपल्या भावना तिच्यावर लादणे हे एक प्रकारची हिंसाच आहे. त्यामुळे महिलांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व मानून तिच्या भावनांचा आदर करणारे पुरुष महिलांना अधिक जवळचे वाटतात. महिलांचा आदर करण्यासोबतच जर तुम्ही तिचे खूप चांगले मित्र किंवा पती असाल तर तिच्यामधील खटकणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही तिला सांगू शकता जेणेकरून तिचा तुमच्या बद्दलचा आदर अधिकच दुणावेल.